प्रवाशांनी भरलेली एसटी बस उलटली, चार जण गंभीर जखमी

रायगड, 15 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) रायगड जिल्ह्यात सोमवारी प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही एसटी बस आज अलिबागहून पनवेलला जात होती. या बसमध्ये 45 ते 50 प्रवासी होते. त्यावेळी ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. भरधाव वेगात असलेल्या एसटी बसचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, या अपघाताचे खरे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

https://x.com/ANI/status/1812732867988054260?s=19

जखमींवर उपचार सुरू

या अपघाताची माहिती मिळताच रायगडच्या पोयनाड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक देखील घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी प्रवाशांना या बसमधून बाहेर काढले आणि जखमींना रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सुदैवाने जीवितहानी टळली

सुदैवाने, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला आदळली त्यानंतर ही बस रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने त्यावेळी ही बस रेलिंगला आणि मोठ्या झाडांच्या फांद्यांना अडकून राहिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, अन्यथा ही बस खड्ड्यात पडून मोठा अपघात झाला असता. त्यामुळे सध्या प्रवासी देवाचे आभार मानत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *