मावळ, 04 जून: (विश्वजीत खाटमोडे) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिले यश मिळाले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी 96 हजार 615 मतांनी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी विजयाची हॅटट्रिक करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांचा पराभव केला आहे. त्यांच्या विजयामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करीत विजयाचा गुलाल उधळला.
https://twitter.com/airnews_mumbai/status/1797968533604999369?s=19
पाहा किती मतदान झाले?
या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना 6 लाख 92 हजार 832 इतके मतदान झाले. यावेळी त्यांना 731 पोस्टल मते मिळाली. या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांना 48.81 टक्के मतदान झाले आहे. तर संजोग वाघेरे यांना 5 लाख 95 हजार 542 इतकी मते मिळाली. सोबतच त्यांना 675 पोस्टल मते मिळाली. या लोकसभा निवडणुकीत संजोग वाघेरे यांना अन्य उमेदवारांच्या तुलनेत 42 टक्के मतदान झाले आहे. याशिवाय मावळ लोकसभा मतदारसंघात नोटाला 16 हजार 729 लोकांनी मतदान केले आहे.
श्रीरंग बारणे यांनी मानले आभार!
दरम्यान, या विजयानंतर श्रीरंग बारणे यांनी मावळच्या जनतेचे आभार मानले आहेत. “आजपर्यंतच्या प्रवासात तुम्ही मतदार बंधु भगिनींनी मला दिलेली साथ अशीच कायम राहू द्या. तुमच्या सेवेसाठी आणि मावळच्या विकासाचे पर्व अखंडीत सुरू ठेवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन,” असे ते म्हणाले आहेत. दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघातून श्रीरंग बारणे यांचा हा सलग तिसरा विजय आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दोन लाखांहून अधिक मताने पराभव केला होता.
मावळमध्ये दोन्ही शिवसेनेत लढत होती
मात्र, यंदा शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ही लोकसभा निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली. या निवडणुकीत मावळमध्ये शिवसेनेचे शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते. मावळ लोकसभा मतदारसंघातून यंदा शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संजोग वाघेरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. त्यानंतर मावळमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. परंतु, मावळच्या जनतेने सलग तिसऱ्यांदा श्रीरंग बारणे यांच्या बाजूने कौल दिला.