मुंबई, 06 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामधून श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली मतदार संघाच्या जागेचा तिढा आता सुटला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध नसल्याचे देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. श्रीकांत शिंदे कल्याणमधील शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी श्रीकांत शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार आहे. असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण
पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळे म्हणजे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा ही आमची महायुती त्यांना निवडून आणेल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कल्याण डोंबिवली लोकसभा मतदार संघाच्या जागेचा वाद सुरू होता. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र, फडणवीस यांच्या या घोषणेमुळे कल्याण डोंबिवली मधून श्रीकांत शिंदे यांना महायुतीकडून तिकीट मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कल्याण डोंबिवली जागेचा तिढा सुटला
तत्पूर्वी, श्रीकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी दिली तर भाजपचा एकपण कार्यकर्ता प्रचारात उतरणार नाही, असा इशारा कल्याण डोंबिवली मतदार संघातील भाजपच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी दिला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे ते भाजपच्या स्थानिक नेत्यांची नाराजी कशी दूर करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, श्रीकांत शिंदे हे कल्याण डोंबिवली मतदार संघातून शिवसेनेकडून दोनदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. तर येत्या लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्याशी लढत होणार आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार होतात का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.