मतदान कार्डशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम

बारामती, 10 ऑगस्टः मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदीचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी विद्यमान मतदान ओळख पत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी बारामती तालुक्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे तथा मतदार नोंदणी अधिकारी यांनी राजकीय पक्षांसोबत आयोजित बैठकीत दिली आहे.

स्कूल बसमध्ये आगीचा तांडव

या विशेष मोहिमेत मतदान ओळख पत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ईआरओ नेट, गरुड, एनव्हीएसपी व वोटर हेल्पलाईन मोबाईल अ‍ॅप या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. तसेच मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र. 6 ब द्वारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

आधार क्रमांक देणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. आधार क्रमांक मिळवण्याचा उद्देश मतदार यादीतील त्याच्या नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि भविष्यात त्यांना अधिक चांगली निवडणूक सेवा प्रदान करणे हा आहे. मतदाराकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी नमुना अर्ज क्र. 6 ब मध्ये नमूद केलेल्या अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी कोणत्याही एक दस्तावेज सादर करावा.

जनजागृती मोहीम राबविताना मतदार/नागरिकांचा आधार क्रमांक गुप्त ठेवण्याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येईल. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 11 सप्टेंबर 2022 रोजी पहिले विशेष शिबीर आयोजीत करण्यात येणार आहे. मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत तालुक्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

यावेळी आरपीआय (आ) चे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, राष्ट्रवादीचे रणजित तावरे (माळेगाव), बापूराव गवळी आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *