केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ दिली, मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले आभार

सोयाबीन खरेदी मुदतवाढ

दिल्ली, 14 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी फोनवरून संवाद साधत सोयाबीन खरेदीसाठी किमान 15 दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यानुसार, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही मागणी मान्य करून सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1878811691628339485?t=5JfOdo77w-lXwvUI_lAN3g&s=19

https://x.com/ChouhanShivraj/status/1878794989158768667?t=v5yo8i2yVMtyQWqQLb7zSg&s=19

मुख्यमंत्र्यांनी मानले केंद्राचे आभार

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा निश्चितच फायदा होईल. दरम्यान, राज्यात सोयाबीन खरेदीची मुदत 12 जानेवारी रोजी समाप्त झाली होती. परंतु, आता केंद्रीय कृषिमंत्र्यांनी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

13.68 लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी

यासंदर्भात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला सांगताना आनंद होतो की, सोयाबीनची खरेदी आधारभूत किमतीवर चालू आहे. आतापर्यंत आम्ही विक्रमी 13.68 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी केले आहे. ही खरेदी अजूनही सुरू राहील, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. तसेच महाराष्ट्र सरकारकडून सोयाबीन खरेदीसाठी मागणी करण्यात आली होती की, सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवावी, त्यामुळे महाराष्ट्र सरकारसाठी आम्ही सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदत वाढवत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

राजस्थानमध्ये 4 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

याशिवाय, राजस्थान सरकारनेही सोयाबीन खरेदीची मुदत 4 फेब्रुवारीपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती, त्यामुळे राजस्थानमध्येही 4 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदी सुरू राहणार आहे. तसेच तेलंगणा राज्याने अतिरिक्त खरेदीची मागणी केली होती, ती देखील वाढवण्यात आलेली आहे, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *