हैदराबाद, 13 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन हा सध्या त्याच्या ‘पुष्पा 2: द रुल’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. पुष्पा 2 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. अशातच या चित्रपटाचा अभिनेता अल्लू अर्जुन याला हैदराबाद शहर पोलिसांनी अटक केली आहे. पुष्पा 2 सिनेमाच्या प्रीमियर दरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात अल्लू अर्जुन विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 105, 118 (1) अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात त्याला आता अटक करण्यात आली आहे. तसेच कोर्टाने अल्लू अर्जुनला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अल्लू अर्जुनला जामीन मिळणार का? याकडे लक्ष असणार आहे.
https://x.com/AHindinews/status/1867535807822868865?t=JwyZnJ6VzhIfu_6y6W8eFA&s=19
35 वर्षीय महिलेचा मृत्यू
हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2: द रुल’ या सिनेमाचा प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. या प्रीमियरला अल्लू अर्जुनने हजेरी लावली. त्यानंतर आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी संध्या थिएटर परिसरात चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचे रुपांतर चेंगराचेंगरीत झाले. या घटनेत एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच यामध्ये सदर महिलेचा आठ वर्षाचा मुलगा देखील जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही मृत महिला तिच्या पती आणि दोन लहान मुलासोबत संध्या थिएटरमध्ये पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरला गेली होती. परंतु, त्याठिकाणी अल्लू अर्जुनला पाहून चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली.
दरम्यान, ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रीमियरला कोणतीही पूर्वसूचना न देता आल्याचा अल्लू अर्जुनवर आरोप केला जात आहे. याप्रकरणी अल्लू अर्जुनसह थिएटर व्यवस्थापनाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच थिएटर मालक आणि व्यवस्थापनाच्या सबंधित लोकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तर आता या घटनेप्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला कडेकोट बंदोबस्तात त्याच्या हैदराबाद येथील निवासस्थानातून अटक केली. त्यानंतर त्याला चिक्कडपल्ली पोलिस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर अल्लू अर्जुनला कोर्टात हजर करण्यात आले.