सोमनाथ सुर्यवंशी यांची हत्या पोलिसांनीच केली, राहुल गांधींचा गंभीर आरोप

परभणी, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) परभणी येथे आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.23) परभणी येथे जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी यावेळी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. याप्रसंगी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, प्रणिती शिंदे यांसारखे काँग्रेसचे नेते अनेक उपस्थित होते.

https://x.com/PTI_News/status/1871132989553627230?t=W3cSGi0RiF6_q_362Nvrwg&s=19

राहुल गांधी काय म्हणाले?

सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “मी सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच मारहाण झालेल्या लोकांना देखील मी भेटलो आहे. त्यांनी मला पोस्टमार्टेम रिपोर्ट, व्हिडिओ, फोटो दाखवले. सोमनाथ सुर्यवंशी यांचा शंभर टक्के कोठडीत मृत्यू झाला आहे. पोलिसांनी त्यांची हत्या केली आहे. तसेच पोलिसांना संदेश देण्यासाठी मुख्यमंत्री विधानसभेत खोटे बोलले आहेत,” असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला. सोमनाथ सूर्यवंशी दलित होते आणि ते संविधानाचे रक्षण करत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ही संविधान नष्ट करणारी आहे. हे प्रकरण तात्काळ सोडवावे आणि ज्यांनी हे कृत्य केले त्यांना शिक्षा व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे राहुल गांधींनी यावेळी म्हटले आहे. येथे राजकारण सुरू नाही. याला विचारधारा जबाबदार आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केल्यामुळे याप्रकरणाला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, ज्यांनी त्यांची हत्या केली ते जबाबदार असून लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, परभणी येथे 10 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरात 11 डिसेंबर रोजी बंदचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. यात आंदोलकांनी दुकाने आणि वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. तसेच पोलिसांनी यावेळी 50 हून अधिक आंदोलकांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचाही समावेश होता. परंतु सोमनाथ सुर्यवंशी यांचा अटकेत असताना न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कारण हे शरीरावरील अनेक जखमा असल्याचे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथ सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सध्या केला जात आहे.

त्यांना श्र्वसनाचा दुर्धर आजार – मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमनाथ सुर्यवंशी यांना पोलिसांनी मारहाण केली नसल्याचे विधानसभेत म्हटले आहे. सुर्यवंशी यांच्या मृत्यूचे कारण श्र्वसनाचा दुर्धर आजार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले होते. तसेच याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्याचबरोबर राज्य सरकारने सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *