बारामती, 28 फेब्रुवारी: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरी नोंदीत फेरफार करून कारखान्याची फसवणूक करण्यात आली, असा गंभीर प्रकार समोर आला आहे. लिपिक, लेबर ऑफिसर, टाईम कीपर, हेड टाईम कीपर आणि इतर कर्मचाऱ्यांनी संगनमत करून हा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे संचालक मंडळाने या सर्वांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला असून, त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घोटाळ्याची सखोल चौकशी होणार
या घोटाळ्याचा तपास अधिक सखोल करण्यासाठी सन 2015 पासून रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची हजेरी, देण्यात आलेले वेतन आणि केलेल्या कामाची तपासणी केली जाणार आहे. म्हणजेच, खरोखर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैसे मिळाले की फक्त कागदावर नावं टाकून गैरव्यवहार झाला? हे तपासले जाईल आणि यात कोणी दोषी आढळल्यास कारवाई होईल, असे कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
दोषींवर कारवाई होणार!
दरम्यान, या गैरव्यवहारात सहभागी असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही आणि कारखान्याच्या प्रगतीला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही गोष्टीला सहन केले जाणार नाही, असेही जगताप यांनी स्पष्ट केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यापूर्वी अनेकदा कारखान्याच्या कामकाजात कारखाना प्रशासनाला सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार, कारखान्याचे आर्थिक नुकसान करणाऱ्या सर्व दोषींवर कठोर पावले उचलली जातील. भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी आवश्यक ती उपाययोजना केली जाणार असल्याचेही जगताप यांनी सांगितले.