स्कायमेटचा मान्सून अंदाज प्रसिद्ध; देशात यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज

मुंबई, 11 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) देशात यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून हंगामात सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने दिला आहे. स्कायमेटने यावर्षीचा मान्सून अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. या अहवालात त्यांनी भारतात यंदा समाधानकारक पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. सोबतच यावर्षी महाराष्ट्रात देखील पुरेसा पाऊस पडेल, अशी शक्यता देखील स्कायमेटने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच यंदा देशाच्या पूर्वेकडील भागात शक्यतो एवढा पाऊस पडणार नाही. देशाचा दक्षिण भाग, पश्चिम भाग आणि उत्तर-पश्चिम भागांसह बहुतांश भागांमध्ये मान्सूनचे चांगले दिवस पाहायला मिळतील, असे स्कायमेट वेदर एव्हीएम येथील हवामानशास्त्र आणि हवामान बदलाचे अध्यक्ष जीपी शर्मा म्हणाले आहेत.

देशात यंदा सरासरीच्या 102 टक्के पाऊस

2024 या वर्षी जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून हंगामात देशाच्या मध्य आणि पश्चिम भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. देशात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या मान्सून हंगामात सरासरीच्या 102 टक्के म्हणजेच 868.6 मिमी पाऊस पडेल. तसेच उत्तर आणि दक्षिण भागात सामान्य पाऊस पडेल, असे स्कायमेटच्या वार्षिक अंदाजात म्हटले आहे. याशिवाय भारताच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यांत यंदा पुरेसा पाऊस पडेल, असा अंदाज देखील स्कायमेटने त्यांच्या अहवालात वर्तविला आहे.

सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस

दरम्यान, देशात मान्सूनच्या सुरूवातीच्या कालावधीत एल निनोच्या प्रभावामुळे या कमी पाऊस पडू शकतो. परंतु, एल निनोचा प्रभाव कमी झाल्यावर सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस होऊन याची भरपाई केली जाईल, असे स्कायमेटने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे. या अहवालानुसार, सप्टेंबरमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये जुन महिन्यात सरासरीच्या 95 टक्के, जुलैमध्ये सरासरीच्या 105 टक्के, ऑगस्टमध्ये सरासरीच्या 98 टक्के आणि सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 110 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, देशातील अनेक राज्यांत सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. अशा परिस्थितीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे देशातील शेतकऱ्यांसह नागरिक हैराण झाले आहेत. तर आता स्कायमेटचा अंदाज प्रसिद्ध झाल्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *