रियासी, 12 जून: (विश्वजीत खाटमोडे) जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील शिव खोडी येथून परतणाऱ्या भाविकांनी भरलेल्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात 9 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, यात अनेक भाविक जखमी झाले आहेत. ही घटना 9 जून रोजी घडली होती. त्यानंतर पोलिसांनी आता रियासी येथे बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या एका दहशतवाद्याचे स्केच जारी करून त्याची माहिती देणाऱ्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1800598815222968733?s=19
हल्ल्यात नऊ भाविक ठार
दरम्यान, वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर हे सर्व भाविक बसमधून शिव खोडी येथून निघाले होते. त्यावेळी चार ते पाच किलोमीटर नंतर दहशतवाद्यांनी या चालत्या बसवर अचानकपणे गोळीबार केला. त्यामुळे ही बस खोल दरीत पडली. बस दरीत कोसळल्यानंतरही या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरूच ठेवला होता. या हल्ल्यात 9 भाविकांना आपला जीव गमवावा लागला. तसेच यामध्ये 41 हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर जम्मू पोलीस लष्कर आणि निमलष्करी दलाने मदत आणि बचाव कार्य सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते.
सुरक्षा यंत्रणेकडून शोध मोहीम सुरू
सोबतच भारतीय लष्कर, सीआरपीएफ यांच्या मदतीने जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे. जंगलातही या दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. यावेळी सुरक्षा दलाचे 11 पथके जंगलाच्या प्रत्येक कोपऱ्यात दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. जंगल परिसरात ड्रोनच्या मदतीने शोध सुरू आहे. अद्याप या दहशतवाद्यांचा तपास लागलेला नाही. त्यामुळे रियासी पोलिसांनी आता गोळीबार करणाऱ्या एका दहशतवाद्याचे स्केच जारी केले आहे. या दहशतवाद्याची माहिती देणाऱ्यास 20 लाख रुपयांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. यावेळी रियासी पोलिसांनी सर्वसामान्य जनतेला या संदर्भातील कोणतीही विश्वसनीय माहिती देण्याचे आवाहन केले आहे.