दिशा सालियान मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन होणार

मुंबई, 12 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दिशा सालियान मृत्यूप्रकरणी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिशा सालियान हिच्या मृत्यूप्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत. यासंदर्भातील लेखी आदेश राज्य सरकारने मुंबई पोलिसांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त पोलिसांच्या नेतृत्वाखाली आजच एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, दिशा सालियान ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची माजी मॅनेजर होती.



दिशाचा 2020 मध्ये संशयास्पद मृत्यू झाला होता. मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट बिल्डिंगच्या 14 व्या मजल्यावरून तिचा मृत्यू झाला होता. तेव्हा दिशा सालियान हिने आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते. तर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी सातत्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.

त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. तर दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची याआधी सीबीआय चौकशी करण्यात आली होती. दिशाचा मृत्यू इमारतीवरून तोल जाऊन झाला होता. त्यावेळी ती नशेत होती, असे सीबीआयने त्यांच्या अहवालात म्हटले होते. यावेळी सीबीआयने याप्रकरणात कोणालाही दोषी धरले नव्हते.

दरम्यान, याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, दिशा सालियान मृत्यूप्रकरणी सत्ताधारी पक्षाकडून आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप होत आहेत. तर याप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चोकशी करण्याची मागणी देखील विरोधकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात दिशा सालियान मृत्यूप्रकरणी एसआयटी चोकशी करण्याचे आदेश दिले होते.

https://twitter.com/ANI/status/1734469946217046426?s=19

त्यानूसार आता याप्रकरणी एसआयटी स्थापन होणार आहे. त्यामुळे दिशा सालियान मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या विधानसभेच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रकरणी एसआयटीची घोषणा केली होती. त्यानूसार आता एसआयटी स्थापन करून आम्ही आमचा शब्द पाळला आहे. दिशा सालियान मृत्यूप्रकरणी कोणाला काही बोलायचे असल्यास धमकावले जात आहे. त्यामुळे जर एसआयटीने मला चौकशीसाठी बोलावले तर मी जायला तयार आहे,” असे ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *