श्रीरंग बारणे यांनी मावळ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला

आकुर्डी, 22 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आकुर्डी येथे आज सकाळी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये वरील सर्वच नेते सहभागी झाले होते. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

https://twitter.com/mieknathshinde/status/1782332396060512371?s=19

https://twitter.com/mipravindarekar/status/1782321420762243559?s=19

महायुतीचे शक्तीप्रदर्शन…..

याप्रसंगी, महायुतीकडून मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. तसेच या रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांनी या नेत्यांच्या अंगावर जेसीबीतून फुलांची उधळण केली. आकुर्डी येथील खंडोबा माळ ते प्राधिकरण या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली. यावेळी महायुतीच्या उपस्थित नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. श्रीरंग बारणे यांनी गेल्या दहा वर्षात मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा विजयी होतील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

मावळमध्ये ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट

मावळ लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 25 एप्रिलपर्यंत असणार आहे. तर उमेदवारांना 29 एप्रिलपर्यंत त्यांचे अर्ज मागे घेता येतील. मावळ मतदारसंघात यंदा शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात संघर्ष पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघ हा विशेष चर्चेत आहे. या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने श्रीरंग बारणे यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, श्रीरंग बारणे हे मावळ मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. त्यांनी 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2019 च्या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत श्रीरंग बारणे हे सलग तिसऱ्यांदा खासदारकीची निवडणूक जिंकतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *