सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार! गोळीबार करून हल्लेखोर पसार

मुंबई, 14 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला असल्याची घटना घडली आहे. आज पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. या व्यक्तींनी यावेळी 3 राऊंड फायरिंग केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घटनेनंतर मुंबई क्राईम ब्रँच आणि एटीएसची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. याप्रकरणाचा तपास सध्या पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा करीत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1779334978599559208?s=19

https://twitter.com/ANI/status/1779341328033489285?s=19

गोळीबाराच्या घटनेचा तपास सुरू

यावेळी हल्लेखोरांनी सलमानच्या घराबाहेर हवेत गोळीबार करून तेथून पळ काढला. सध्या या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त आलेले नाही. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेरील सुरक्षा वाढवली आहे. सध्या मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणेसह फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. यावेळी फॉरेन्सिक टीमला अपार्टमेंटच्या भिंतीवर गोळ्यांच्या खुणा आढळल्या आहेत. तर पोलिसांनी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लावलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने दिली होती धमकी

दरम्यान, अभिनेता सलमान खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने यापूर्वी अनेकदा जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या वर्षी देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून सलमान खानला धमकीचा ईमेल आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली होती. लॉरेन्स बिश्नोईने एका मुलाखतीत सलमान खानला मारणार असल्याचे उघडपणे सांगितले होते. तर याआधीही सलमानवर हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे. अशा परिस्थितीत सलमानच्या घराबाहेर पुन्हा एकदा गोळीबाराची घडल्यामुळे सलमानचे चाहते चिंतेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *