दिल्ली, 22 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे.
https://twitter.com/mieknathshinde/status/1771051908322513278?s=19
या पदाधिकाऱ्यांचा देखील पक्ष प्रवेश
काल रात्री उशीरा झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह संपर्कप्रमुख जनार्दन मालपगारे, उपजिल्हाप्रमुख देविदास सोमवणे, दक्षिण विभागाचे तालुकाप्रमुख विजय बडाख, नगरसेवक संतोष कांबळे, संजय बादुले, सागर तलवार, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब वाघमारे, संजय फरगडे, सागर कुदळे, विशाल दुर्गे, किरण भोसले, सिद्धार्थ वैद्य यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
लोकसभेचे तिकीट मिळणार?
हा कार्यक्रम एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, भाऊसाहेब कांबळे हे 2009 आणि 2014 च्या निवडणूकीत श्रीरामपूरचे आमदार झाले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. मात्र, या निवडणूकीत शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून 2019 ची विधानसभा निवडणूक लढविली होती. मात्र, या निवडणूकीत देखील त्यांचा पराभव झाला होता. तर भाऊसाहेब कांबळे यांनी आता शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेतर्फे उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.