मुंबई, 29 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाला पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अशातच मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का बसला आहे. त्यांचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव आणखी काही सामन्यांना मुकणार आहे. सूर्यकुमार यादव हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त झालेला नाही. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. अशा परिस्थितीत तो आणखी काही सामन्यांतून संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सला सूर्याची उणीव भासणार
सूर्यकुमार यादव दुखापतीतून तंदुरुस्त होण्यासाठी सध्या कठोर परिश्रम घेत असून, त्याची प्रगती चांगली होत आहे. लवकरच तो मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्राने वृत्तसंस्थेला दिली आहे. त्यामुळे सूर्यकुमार मुंबई इंडियन्स संघात कधी दाखल होणार? याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्सचे पुढचे दोन सामने घरच्या मैदानावर म्हणजेच मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहेत. मुंबईचा पुढील सामना 1 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात 7 एप्रिलला लढत होणार आहे. या सामन्यांमध्ये मुंबईला सूर्यकुमार यादवची उणीव नक्कीच भासणार, यामध्ये काही शंका नाही.
आफ्रिका दौऱ्यात दुखापत झाली होती
सूर्यकुमार यादवला डिसेंबर 2023 मधील दक्षिण आफ्रिका दौऱ्यात दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो यावर्षी एकही सामना खेळलेला नाही. आयसीसी टी-20 क्रमवारीत सूर्या पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्ससाठी तो अतिशय महत्त्वाचा खेळाडू आहे. मात्र, बीसीसीआय सूर्यकुमार यादवच्या तंदुरुस्तीबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. कारण, तो यावर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धत मोठी भूमिका बजावू शकतो. त्यामुळे पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावरच सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन करणार आहे.