जुन्नर, 19 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती शिवाजी महाराज यांची बुधवारी (दि.19) 395 वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी, किल्ले शिवनेरी येथे आज मोठ्या उत्साहात जन्मोत्सव सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री आशिष शेलार यांनी प्रमुख उपस्थिती लावली.
https://x.com/CMOMaharashtra/status/1892064252153954313?t=uSfg-6ZH5X3EHYgWaNDkvA&s=19
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मंत्री यांनी शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराजांच्या बालरूपाचा पाळणा झुलवला. यावेळी जिजाऊंच्या लेकींनी मायेने पाळणा गायला आणि संपूर्ण वातावरण शिवमय झाले. शिवनेरी गडावर पारंपरिक वाद्यांच्या गजरात सोहळा संपन्न झाला. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी शिवनेरी गडावर भाविक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवप्रेमींची मोठी गर्दी
तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिवनेरी किल्ल्यावर माता-भगिनींनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत केले. यानंतर मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांनी महाराजांच्या जन्मस्थळी छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. संपूर्ण गड शिवजयंतीमय झाला होता. तसेच यावेळी शिवनेरी किल्ला शिवरायांच्या जयघोषाने दणाणून गेला होता. या पार्श्वभूमीवर, मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवनेरीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन
दरम्यान, शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर आज विविध सांस्कृतिक आणि साहसी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध साहसी क्रीडा प्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधले. शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण शिवनेरी किल्ल्यावर भव्य विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच किल्ल्याला आकर्षक अशी सजावट करण्यात आल्याने किल्ल्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. या भव्य सजावटीमुळे संपूर्ण परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, शिवभक्त आणि पर्यटक मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून सोहळ्याचा आनंद घेत आहेत.