शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला; 10 जण जखमी

शिवनेरी किल्ला मधमाशांचा हल्ला

जुन्नर, 19 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज (दि.19) मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना शिवनेरी किल्ल्यावर एक अनपेक्षित घटना घडली. शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांच्या झुंडीने हल्ला केल्याने 10 जण जखमी झाले आहेत. शिवजयंतीनिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, शिवनेरी किल्ल्यावरही मोठ्या संख्येने नागरिक आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी अचानक मधमाशांच्या झुंडीने हल्ला केला.

https://x.com/ANI/status/1892135817851830763?t=PkB4sXJQtqtEl-1abuXCrQ&s=19

जखमींवर उपचार सुरू

या घटनेत 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जखमींमध्ये 10 पैकी 7 जण हे वैद्यकीय कर्मचारी आणि वन अधिकारी असून ते त्यावेळी ड्युटीवर तैनात होते. तसेच या घटनेत 3 शिवभक्त देखील जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मधमाशांचा हल्ला का झाला याचे कारण स्पष्ट झालेले नाही. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेतली असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. या घटनेमुळे काही वेळ खळबळ उडाली होती. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून स्थानिक प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे. तर यासंदर्भात अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 395 वी जयंती आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवनेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान असून, शिवजयंतीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणात शिवभक्त येत असतात. शिवजयंतीच्या निमित्त आज शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विविध मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी गर्दी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *