पुणे, 19 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) शिवनेरी बसेस आता नव्याने उद्घाटन झालेल्या मुंबईतील अटल सेतूवरून धावणार आहेत. यासंदर्भातील घोषणा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने केली आहे. त्यानूसार, उद्यापासून (दि.20) पुण्यातून दररोज दोन बसेस मुंबईसाठी सोडल्या जातील. तसेच या बसेस दररोज मुंबईहून परत येतील. या बसेस प्रायोगिक तत्त्वावर सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. विशेष म्हणजे, या शिवनेरी बसेसच्या मुंबई ते पुणे मार्गावरील भाड्यात कोणताही बदल झालेला नाही.
https://twitter.com/msrtcofficial/status/1759421245429313742?s=19
https://x.com/ANI/status/1759422348132782327?s=20
पाहा कोणत्या दोन बसेस धावणार?
यामध्ये पुणे स्टेशन ते मंत्रालय ही बस सकाळी 7:30 वाजता सोडण्यात येणार आहे. तसेच स्वारगेट ते दादर ही बस सकाळी 7 वाजता सोडण्यात येणार आहे. याची माहिती एसटी महामंडळाने दिली आहे. या बस उद्यापासून शिवडी – नाव्हाशेवा अटल सेतूवरून धावणार आहेत. त्यामुळे या बसमधून पुणे ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बराच वेळ वाचणार आहे. तर ही बससेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या बससेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
तिकीट दरात कसलाही बदल नाही
दरम्यान, शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान बांधण्यात आलेल्या नव्या अटल सेतूवरून एसटीची शिवनेरी बस धावणार असल्यामुळे या बसचे तिकीट वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, एसटी महामंडळाने या शिवनेरी बसेसच्या मुंबई-पुणे मार्गावरील तिकीट दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना आहे त्याच दरात या बससेवेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे या शिवनेरी बसला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.