पॅरिस, 24 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 गड-किल्ल्यांना युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा, यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारचे शिष्टमंडळ रविवारी (दि.23) पॅरिस येथे दाखल झाले आहे. त्यावेळी या शिष्टमंडळाने युनेस्कोमधील भारताचे राजदूत विशाल शर्मा यांची भेट घेतली. याची माहिती मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे.
https://x.com/ShelarAshish/status/1893697985239986223?t=0w1zKpW5svU7xBVuPCo5mQ&s=19
मंत्री आशिष शेलार यांची माहिती
विशाल शर्मा हे महाराष्ट्र आणि मुंबईचे सुपुत्र असून, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शिवछत्रपतींच्या 12 गड-किल्ल्यांचे जागतिक वारसामध्ये नामांकन झाले आहे. मात्र, अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित असून, त्यासंदर्भात महत्त्वाचे सादरीकरण आणि पुढील प्रक्रियेची तयारी सुरू असल्याचे मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले. तसेच याविषयी शिष्टमंडळासोबत चर्चा केल्याचेही माहिती त्यांनी दिली.
या शिष्टमंडळात अपर मुख्य सचिव विकास खारगे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे उपसंचालक हेमंत दळवी आणि वास्तुविशारद शिखा जैन यांचा समावेश आहे. जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून व्यापक प्रयत्न सुरू असून, लवकरच या संदर्भात अंतिम निर्णय अपेक्षित आहे.
या गड किल्ल्यांचा समावेश
तत्पूर्वी, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने युनेस्कोच्या 2024-25 च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 11 गड किल्ले आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याचा नामांकनाचा प्रस्ताव पाठविला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या किल्ल्यांना शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा, ऐतिहासिक महत्त्व आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत या 12 गड किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील एका किल्ल्याचा समावेश आहे.