मुंबई, 27 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून त्यांच्या 17 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची ही पहिली यादी असून, या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 22 ते 23 जागांवर लढण्यावर ठाम आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला महाविकास आघाडीतील पक्ष आणखी जागा देणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1772829709073862852?s=19
या नेत्यांना मिळाली संधी
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने लोकसभेसाठी त्यांच्या 17 उमेदवारांची पहिली यादी आज प्रसिद्ध केली. यामध्ये बुलढाणा मधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ – वाशिम मतदार संघातून संजय देशमुख, मावळ मतदार संघातून संजोग वाघेरे पाटील, सांगलीतून चंद्रहार पाटील, हिंगोली मधून नागेश अष्टीकर, छत्रपती संभाजीनगर मधून चंद्रकांत खैरे, धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर, शिर्डी मधून भाऊसाहेब वाघचौरे, नाशिक मतदार संघातून राजाभाऊ वाझे, रायगड मधून अनंत गिते, रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघातून विनायक राऊत, ठाणे मतदार संघातून राजन विचारे, मुंबई-ईशान्य मतदार संघातून संजय दीना पाटील, मुंबई-दक्षिण मतदार संघातून अरविंद सावंत, मुंबई-वायव्य मतदार संघातून अमोल किर्तीकर, परभणी मधून संजय जाधव आणि मुंबई दक्षिण मध्य मतदार संघातून अनिल देसाई हे उमेदवार लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
कोणाला किती जागा मिळणार?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. यासंदर्भात वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. यामध्ये काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तर लवकरच त्यांचा जागा वाटपाचा हा तिढा सुटेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या 48 जागांपैकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.