शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन

सांगली, 31 जानेवारीः (विश्वजीत खाटमोडे) शिवसेना पक्षाचे शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांचे न्यूमोनिया आजारामुळे निधन झाले. न्यूमोनिया झाल्यामुळे अनिल बाबर यांना काल सांगली मधील एका रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. अनिल बाबर यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. दरम्यान, अनिल बाबर यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

https://twitter.com/ANI/status/1752538195953389649?s=19

त्यांची प्रदीर्घ अशी राजकीय कारकीर्द!

अनिल बाबर हे वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी खानापूर तालुक्यातील गर्दी या गावचे सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य आणि 4 वेळा सांगलीच्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. अनिल बाबर यांनी 1990, 1999, 2014, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. दरम्यान, शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर अनिल बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली होती. त्यानंतर ठाकरे गटाने दाखल केलेल्या शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेच्या यादीत अनिल बाबर यांचे देखील नाव होते.

संपुर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा

तत्पूर्वी, गेल्याच वर्षी अनिल बाबर यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यानंतर काही महिन्यांतच अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. त्यामुळे बाबर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच आमदार अनिल बाबर यांच्या निधनामुळे संपुर्ण सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, त्यांच्या निधनामुळे राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. बाबर यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगलीला रवाना झाले आहेत. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील गर्दी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *