शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा

शिवनेरी, 19 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आज 394 वी जयंती साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनावणे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1759432104067387826?s=19

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सोहळा संपन्न

शिवजयंती निमित्त शिवनेरी किल्ल्यावर यावेळी प्रथेप्रमाणे पारंपरिक वेशातील महिलांनी शिवरायांची महती सांगणारा पाळणा गायला. त्यानंतर बाल शिवाजी राजांची वाजत गाजत पालखी काढण्यात आली. यावेळी किल्ल्यावर शिवाजी महाराजांची महती कथन करणारे पोवाडे, नाटकं यांचं सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पाळणा हलवला. या सोहळ्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर शिवभक्तांनी मोठी गर्दी केली होती. शिवजन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर सोडण्यात आले.

शिवजयंती सोहळ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी!

दरम्यान, शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर आज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिवनेरी किल्ल्यावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई आणि मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे. तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शिवनेरी किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *