दिल्ली, 24 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन याने शनिवारी (दि.24) सकाळी निवृत्ती जाहीर केली आहे. शिखर धवनने आपण आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. त्याने यासंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमधून शिखर धवनने ही माहिती दिली. शिखर धवन याने या व्हिडिओमध्ये त्याच्या या क्रिकेट प्रवासाबद्दल त्याचे कुटुंबीय, मित्र, टीम इंडियाचे सहकारी आणि प्रशिक्षक यांचे आभार मानले आहेत. दरम्यान, शिखर धवनने अचानक केलेल्या निवृत्तीच्या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसणार आहे.
https://x.com/SDhawan25/status/1827164438673096764?s=19
शिखर धवनने काय म्हटले?
“आज मी अशा वळणावर उभा आहे जिथून जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा मला फक्त आठवणी दिसतात आणि जेव्हा मी पुढे पाहतो तेव्हा मला संपूर्ण जग दिसते. माझी फक्त एकच इच्छा होती भारतासाठी खेळणे आणि ते झालेही ज्यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. माझे कुटुंब, माझे बालपणीचे प्रशिक्षक तारिक सिन्हा सर आणि मदन शर्मा ज्यांच्याकडून मी क्रिकेट शिकलो. त्यानंतर माझा संघ त्यामधून मी वर्षानुवर्षे क्रिकेट खेळलो. मला आणखी एक कुटुंब मिळाले, नाव मिळाले आणि त्यात तुम्हा सर्वांचे प्रेम मिळाले. ते म्हणतात ना गोष्टीत पुढे जाण्यासाठी पाने पलटणे आवश्यक आहे. मी तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे.” असे त्याने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
क्रिकेट मंडळाचे मानले आभार
“आता मी माझ्या क्रिकेट प्रवासाला अलविदा म्हणत आहे, माझ्या मनात एक शांतता आहे की मी माझ्या देशासाठी खूप खेळलो. मी बीसीसीआय आणि डीडीसीए चा खूप आभारी आहे ज्यांनी मला संधी दिली आणि माझ्या सर्व चाहत्यांचा ज्यांनी मला खूप प्रेम दिले. मी माझ्या मनाला इतकेच सांगतो की, तू या गोष्टीचे दुःख नको मानू आपल्या देशासाठी पुन्हा खेळणार नाही, पण या गोष्टीचा आनंद मान की, तु आपल्या देशासाठी खेळला आणि माझ्यासाठी सर्वात मोठी गोष्ट आहे की मी खेळलो,” असे शिखर धवन या व्हिडिओत म्हणाला आहे.
शिखर धवनची क्रिकेट कारकीर्द
दरम्यान, शिखर धवन भारताकडून 167 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला. या सामन्यात त्याने 44.11 च्या सरासरीने 6793 धावा केल्या. ज्यामध्ये 17 शतके आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 34 कसोटी सामन्यांमध्ये 40.61 च्या सरासरीने 2315 धावा केल्या. ज्यामध्ये 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. सोबतच शिखर धवनने 68 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले. ज्यात त्याने 27.92 च्या सरासरीने 1759 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 11 अर्धशतके झळकावली.