‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ राज्यस्तरीय स्पर्धेत बारामतीच्या शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचा दुसरा क्रमांक

बारामती, 06 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत बारामती परिसरातील शारदानगर येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेने खासगी शाळा गटात द्वित्तीय क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ह्या शाळेला 31 लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली. सोबतच या शाळेचा सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

एक लाखांहून अधिक शाळांचा सहभाग!

याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार कपिल पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार राजेश पाटील, आमदार शेखर निकम, माजी खासदार रामशेठ ठाकूर, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, गिनीज बुक ऑफ इंडियाचे प्रवीण पटेल आणि मिलिंद वेर्लेकर तसेच राज्यातील विविध शाळांचे शिक्षक, संस्था चालक व विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान राज्यात 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात आले होते. या अभियानात 01 लाख 03 हजार शाळा तसेच सुमारे 2 कोटी विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

प्रथम क्रमांकाच्या शाळांना 51 लाख रुपये

यावेळी मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत शासकीय गटात वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील जिल्हा परिषदच्या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ह्या शाळेला यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 51 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. तसेच या स्पर्धेत खासगी शाळा गटात नाशिक जिल्ह्यातील बेळगाव ढगा येथील एस्पेलियर हेरिटेज स्कूल या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्यांना देखील 51 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे.

शिक्षकांची शाळाबाह्य कामे कमी करणार: मुख्यमंत्री

दरम्यान, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक शाळांचा परिसराचा आणि त्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. “आयुष्यात आई वडिलांनंतर शिक्षक हेच मुलांच्या सगळ्यात जवळ असतात. आयुष्याला नवीन आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात. त्यामुळेच तुम्हाला न्याय देताना हातचे काही राखून ठेवले जाणार नाही. तसेच शाळाबाह्य कामे हळूहळू कमी करण्यात येतील,” असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शिक्षकांना दिले. तसेच ग्रामीण भागात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची गळती कमी व्हायला हवी, अशी अपेक्षा देखील मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *