शरद पवारांचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना जेवणाचे निमंत्रण

बारामती, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीमध्ये उद्या (दि.02) नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी जेवणाचे निमंत्रण दिले आहे. यासंदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिले आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या निमंत्रणाचा स्वीकार अजित पवार करणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शरद पवारांनी पत्रात काय म्हटले?

“आपण 02 मार्च रोजी बारामती येथे शासकीय दौऱ्यानिमित्त येत असल्याचे समजले. सदर शासकीय कार्यक्रमांप्रसंगी संसद सदस्य नात्याने मला आणि सुप्रिया सुळे यांना उपस्थित राहायला आवडेल. तसेच उक्त दिनी महारोजगार मेळाव्याचे आयोजन मी संस्थापक अध्यक्ष असलेल्या विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील मैदानात करण्यात येत असल्याने संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी आपले संस्थेच्या प्रांगणात यथोचित स्वागत करू इच्छितो. करीता विद्या प्रतिष्ठान, विद्यानगरी, बारामती येथील अतिथी निवासात चहापानासाठी आपणास निमंत्रित करतो,” असे शरद पवार यांनी या पत्रात म्हटले आहे.

निमंत्रणाचा स्वीकार करण्याचे आवाहन

“आपण मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर बारामती शहरी प्रथमतः येत आहात याचा मला मनोमन आनंद आहे. बारामती येथील ‘गोविंदबाग’ ह्या माझ्या निवासस्थानी अतिथ्य भोजनाचा आस्वाद घ्यावा, असे मी आपणास दूरध्वनीवरून निमंत्रण यापूर्वीच दिले आहे. कृपया नमो महारोजगार मेळाव्यानंतर आपण मंत्रीमंडळातील इतर सहकाऱ्यांसह ह्या निमंत्रणाचा देखील आपण स्वीकार करावा. दोन्ही सस्नेह आमंत्रणांचा आपण स्वीकार कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्री यांना देखील सस्नेह निमंत्रित करीत असून, कृपया त्यांनी निमंत्रणाचा स्वीकार करावा, असेही शरद पवार यांनी या पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *