मनमाड, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले की, मोदी बोलतात एक आणि दुसरेच करतात. मोदींच्या हातात सत्ता आल्यानंतर देशात लोकशाही शिल्लक राहणार नसल्याचे शरद पवारांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या सभेला महाविकास आघाडीचे अनेक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
https://twitter.com/PawarSpeaks/status/1791172913191592385?s=19
लोकशाही शिल्लक राहणार नाही – पवार
“मोदींची भूमिका बोलायची एक आणि करायची दुसरी. तुमच्या भागात पंचायत समिती, जिल्हा परिषदेची निवडणूक झाली का? आज मोदी साहेबांच्या हाती सत्ता आल्यानंतर पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद थांबली. याचा परिणाम देशाच्या निवडणुका सुद्धा थांबवतील आणि देशाची सत्ता आपल्या मुठीमध्ये घेतील. याने लोकशाही शिल्लक राहणार नाही. तुमचा माझा सगळ्यांचा अधिकार उध्वस्त होईल. हे महत्त्वाचे संकट आज या देशासमोर आले आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. तसेच आपल्याला अपयश मिळाल्यानंतर लोकांचा विचार भलतीकडे वळवायचा, अशी भूमिका नरेंद्र मोदींची असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.
मोदींवर निशाणा
“प्रधानमंत्री खूप वेळा समजातील लहान घटकांना, अल्पसंख्याकांना अजून घाबरून कसे टाकता येईल, या प्रकारचा निकाल ते घेतात. ते सांगतात, ज्यांच्या घरात जास्त मुलं जन्माला येतात, तेच तुमच्या घरातील सोनं घेऊन जातील. ही शुद्ध फसवणुक आहे. अशी एकही गोष्ट याठिकाणी होणार नाही. पण या निमित्ताने महत्त्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अपयश मिळाल्यानंतर लोकांचा विचार भलतीकडे वळवायचा. आणि त्यांच्या मनात शंका निर्माण करायची हे सूत्र आजच्या प्रधानमंत्र्यांचे आहे,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.
“प्रधानमंत्री तुमच्या जिल्ह्यात येऊन भाषण करतात की, तुमच्या घरातील सोनं काढलं जाईल आणि ठराविक लोकांना दिले जाईल. त्यांना समजत नाही, की देशातील कोट्यवधी लोकांच्या घरातलं सोनं कोण काढून घेईल? आणि काढून घेत असेल, कोणी चोरी करत असेल, तर सरकार काय बघ्याची भूमिका घेणार आहे? पोलिस तर यासंबंधीचा काही निकाल देणार नाही, पण लोकांच्या मनात एक प्रकारचा संभ्रम आणि भीती निर्माण करण्याचा काम त्यांचं आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले.
मोदी अभिमानाने सांगतात, आम्ही गरीब 80 कोटी लोकांना फुकट धान्य दिले. तुमच्या वाडवडीलांच्या खिशातून हे धान्य दिले नाही. हे धान्य दिलं, ते पिकवलं कोणी? काळ्या आईशी इमान राखतो, त्या शेतकऱ्याने धान्य पिकवलं. देशाची गरज भागवून, अधिक धान्य तयार होईल, याची खबरदारी घेतली. दुनियेतील 11 देशांना धान्य पुरवठा करणारा देश भारत केला. आज मोदी साहेब सांगतात, आम्ही सगळ्यांना फुकट धान्य देतो. ते खोट्या गोष्टी सांगतात, अशा शब्दांत शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.