बारामती, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती येथे गुरूवारपासून (दि.16) ‘कृषिक 2025’ या भव्य कृषी प्रदर्शनाला सुरूवात झाली आहे. या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (आर्टिफिशियल इंटेलिजन्स). याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले की, “कृत्रिम बुद्धिमत्ता ही केवळ शेतीपुरती मर्यादित राहणार नाही, तर आरोग्य, शिक्षण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडवेल.”
https://x.com/PawarSpeaks/status/1879906381689745617?t=c564g9RGfGgZE5sQXc9B7g&s=19
‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ तंत्रज्ञानाचे महत्त्व
यावेळी महाराष्ट्रातील ऊस शेतीचे महत्त्व अधोरेखित करताना शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्राच्या शेतीचे अर्थकारण हे जर आपण बघितले तर ऊसाला प्रोत्साहन देणं अत्यंत गरजेचे आहे. पण ती करत असताना काही दुरुस्त्या करता येतील का? उदाहरणार्थ कमीत कमी पाणी त्याच्यावर आधारित ऊस करता येईल का? जे काही पीक आपण घेऊ त्याचा दर एकरी उत्पादन अधिक वाढवू शकू का? आणि तिसरा मुद्दा त्या ऊसाद्वारे साखरेचे प्रमाण अधिक कसे वाढवता येईल? याची काय खबरदारी घेता येईल का? आणि त्या संदर्भात काही करायचे असेल तर आपल्याला हे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करता येईल.”
ऊस शेतीत एआय चा वापर
या उद्देशाने मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या सहकार्याने एक प्रयोग राबविण्यात आला आहे. त्यासाठी 1,000 शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये एआय च्या मदतीने ऊस लागवड करण्यात आली असून, जर नीट काळजी जर घेतली आणि हे तंत्रज्ञान नीट वापरले तर प्रति एकरी 120 टन उत्पादन घेणे शक्य आहे. तेही कमी पाण्यामध्ये, मर्यादित क्षेत्रामध्ये आणि तो प्रयत्न आज इथे सुरू झालेला आहे, असे शरद पवार यांनी यावेळी म्हटले आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग बाकीच्या क्षेत्रामध्येही कसा करता येईल? ज्यामध्ये नवीन नवीन तंत्र आले, ज्यात सेन्सर्स, ड्रोन, रोबोटिक्स, सॅटेलाईट मॅपिंग, आयओटी थिंग्स या सगळ्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खत, पाणी व्यवस्थापन, कीड-रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, योग्य तंत्र, उत्पादनाचा अंदाज आणि हवामानानुसार पीक पद्धतीचे नियोजन या सगळ्या गोष्टीत काम करणे शक्य आहे आणि त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून ते तंत्र नव्या पिढीच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचावं याची काळजी या प्रदर्शनात घेत आहोत, असे त्यांनी यावेळी म्हटले आहे..
जिरायत शेतीसाठी नवीन उपाययोजना
बारामतीतील 60 टक्के शेती जिरायत स्वरूपाची आहे. त्यामुळे जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारे ज्वारीचे नवीन वाण विकसित करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. यासाठी या प्रदर्शनात विशेष प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आहेत, असे शरद पवारांनी सांगितले आहे. या सगळ्या उपक्रमाला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. केंद्रातल्या संबंधित घटकांशी आम्ही लोकांनी सुसंवाद साधलाय आणि मला आनंद आहे राज्य सरकारही पूर्ण ताकदीने या कामाला मदत करण्यासाठी पुढे येत आहे. असे नमूद करताना पवार यांनी सांगितले की, “बारामतीतील हे प्रयोग राज्यभर पोहोचवून महाराष्ट्रातील शेती समृद्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”