मुंबई, 07 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नवीन नाव दिले आहे. त्यानूसार, शरद पवार गटाला आता ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ असे नाव मिळाले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला आता आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार या पक्षाच्या नावावर निवडणूक लढवता येणार आहे. दरम्यान, शरद पवार गटाच्या नवीन पक्ष चिन्हासंदर्भात अजून कोणताही निर्णय झालेला नाही. यासंदर्भातील निर्णय लवकरच होऊ शकतो.
https://twitter.com/ANI/status/1755211843193143721?s=19
‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’
तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वादावर निकाल जाहीर केला होता. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या बाजूने निकाल देत त्यांना राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले होते. त्यामुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पक्षाच्या नावाचे पर्याय सुचविण्यासाठी आज दुपारपर्यंतची मुदत दिली होती. त्यानंतर शरद पवार गटाने दिलेल्या मुदतीच्या आत निवडणूक आयोगासमोर तीन नावे सादर केली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला आगामी निवडणुकांमध्ये या तीन नावांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे पक्षाचे नाव वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यानूसार, शरद पवार गटाच्या पक्षाचे नाव आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार असे असणार आहे.
पक्षाचे नाव आणि चिन्हाचा वाद आता सुप्रीम कोर्टात
निवडणूक आयोगाने अजित पवार गटाच्या बाजूने दिलेल्या निकालाच्या विरोधात शरद पवार गट सुप्रीम कोर्टात जाणार आहे. त्याच्याआधी अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यावेळी अजित पवार गटाकडून सुप्रीम कोर्टात कॅव्हेट अर्ज दाखल करण्यात आला आहे. शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात याचिका दाखल केल्यानंतर यामध्ये आमचे म्हणणे सुप्रीम कोर्टाने ऐकून घ्यावे, अशी मागणी अजित पवार गटाने या अर्जातून केली आहे.