मोडनिंब येथील जाहीर सभेत शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

माढा, 24 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) माढा लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे जाहीर सभा पार पडली. या सभेतून शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्यावर निशाणा साधला. यावेळी शरद पवारांनी देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, इंधनाच्या किमतीत वाढ, नोटाबंदी यांसारख्या मुद्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

https://twitter.com/PawarSpeaks/status/1783103695187759406?s=19

पेट्रोलच्या किमतीवरून पवार काय म्हणाले?

गेले 10 वर्ष देशाची सत्ता भाजपच्या हाती आहे आणि नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत. मोदींनी अनेक आश्वासने दिली होती. मी महागाई कमी करणार, पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर 50 दिवसांच्या आत महागाईच्या संकटातून लोकांना बाजूला करणार, हे पहिले आश्वासन होते. मात्र त्यांनी तसे केले नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले. एकेकाळी वाहने कमी होती, आता वाहनांची संख्या वाढली. या वाहनांची महत्त्वाची गरज पेट्रोलची आहे. 2014 साली मोदींनी आश्वासन दिलं होतं की, 50 दिवसांच्या आत पेट्रोलची किंमत 50 टक्क्यांनी खाली आणणार. 2014 साली पेट्रोलची किंमत 71 रुपये प्रती लिटर होती. मोदींचा शब्द होता 50 दिवसात खाली आणतो. लोकांना वाटलं 71 ची किंमत 50 ते 60 रुपयांवर येईल. आज 3650 दिवस मोदींनी आश्वासन देऊन झालं आहे. आज पेट्रोलची किंमत 71 रुपयांवरून 106 रुपयांवर नेली. देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था संकटात गेली आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

गॅसच्या वाढत्या किमतीवरून टीका

घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो. हा गॅस सिलेंडर आम्ही स्वस्तात देऊ हा शब्द मोदींनी 2014 ला दिला होता. त्यावेळी गॅस सिलेंडरची किंमत 410 होती आज 1160 रुपये आहे. 410 ची कमी केलेली किंमत 1160 झाली. कसा विश्वास ठेवायचा या लोकांवर? तरूण मुलांना बाकी काही नको, त्यांना काम करण्याचा अधिकार द्या, प्रपंच चालवण्याची ताकद द्या. 2014 साली दहा वर्षाच्या आत देशातील बेकारी घालवून हाताला काम देऊ, असेही मोदींनी सांगितले होते, असे ते यावेळी म्हणाले.

बेरोजगारीच्या मुद्यावर पवार काय म्हणाले?

जगातील सर्व देशांनी काढलेली संघटना आहे. इंटरनॅशल लेबर ऑर्गनाईजेशन (ILO) ही संस्था जगातील सर्व देशातील बेकारीचा अभ्यास करते. त्यात भारताचा अभ्यास करून त्यांनी निष्कर्ष काढला की, भारतात 100 पैकी 87 तरूण नोकरीविना आहेत. आज त्यांना नोकरी मिळत नाही. कशी बेकारी घालवली? याचा अर्थ एकचा आहे की, नरेंद्र मोदींनी दिलेला शब्द पाळलेला नाही, अशा शब्दांत शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *