शरद पवारांचा भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल

शिर्डी, 05 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शिर्डी येथे शिबिर नुकतेच पार पडले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार डॉ अमोल कोल्हे, राजेश टोपे यांच्यासह विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांनी त्यांच्या भाषणात देशातील विविध मुद्यांवर आपली भूमिका सविस्तरपणे मांडली. तसेच त्यांनी यावेळी भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

भाजप आणि मोदी सरकारवर टीका

“आपल्या हातामध्ये सत्ता आल्यानंतर अनेक आश्वासने आणि कार्यक्रम पुढे घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी न करता युवकांची फसवणूक करण्याचे काम हे भारतीय जनता पार्टीने केले आणि हे हळूहळू ते लोकांच्या लक्षात यायला लागले. मी पार्लमेंट मध्ये बघतो, नरेंद्र मोदी हे क्वचितच येतात. एखादं धोरण हे कृतीत येवो अथवा ना येवो त्याची मांडणी ते अशी करतात की, पार्लमेंटचे मेंबर देखील काही वेळासाठी थक्क होतात, घोषणाही खूप करतात. 2016-17 सालचा अर्थसंकल्प ज्यावेळी पार्लमेंट मध्ये मांडला गेला होता त्यात असे सांगितले होते की, 2022 पर्यंत या देशातल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आम्ही दुप्पट करू आज 2024 आहे. काही बदल नाही याचा अनुभव आपल्याला आलाच. मोदींनी पार्लमेंटमध्ये एक दिवशी सांगितलं की, 2022 पर्यंत शहरी भागातल्या लोकांना आम्ही पक्की घर देऊ, पण या घोषणा हवेतच राहिल्यात. ते असे सांगतात की, गॅरंटी आहे माझी, पण ती गॅरंटी काही खरी नाही याचा अनुभव अनेक वेळेला आलेला आहे.” अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजप आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

रोजगार आणि महागाईचा प्रश्न

“देशाची तरुण पिढी ही अस्वस्थ आहे ते काम मागत आहे. आणि याचाच परिणाम आपल्याला पार्लमेंट मध्ये दिसून आला, काही तरुण संसदेत घुसलेत आणि एकच गोंधळ उडाला त्यावर विरोधकांनी आवाज उठवला, तर त्यांना निलंबित करण्यात आले. आज नियोजन मंडळाने जे आकडे सांगितले की, 25 वर्षाच्या खाली जो तरुण आहे त्यातील 42 टक्के तरुण आज बेकार आहे आणि दिवसेंदिवस हा बेकारीचा दर देशांमध्ये वाढत आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने तिसरा गंभीर प्रश्न म्हणजे महागाईचा प्रश्न हा आहे. या संदर्भात किती गोष्टी सांगता येतील. आज आपण पेट्रोल पंपावर जातो तिथे गॅस स्वस्त केला म्हणून सांगणारा मोदींचा फोटो; 450 रुपये गॅसचे सिलेंडर होते ते आज 1 हजार 100 रुपयांवर जाऊन पोहोचले आहे आणि हे दर आज सामान्य माणसाला न परवडणारे आहेत. डाळी, अन्नधान्य, तेल किंवा अन्य गोष्टी याची महागाई आता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. देशाची अर्थव्यवस्था ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मोदींनी आश्वासन दिले की, 2024-25 पर्यंत या देशाची अर्थव्यवस्था आम्ही 5 लाख कोटींवर नेऊ पण, आज जर आपण माहिती घेतली, तर 5 लाखांच्या 50 टक्के सुद्धा ही अर्थव्यवस्था पोहोचलेली नाही.” अशी टीका त्यांनी केली आहे.

शेतकरी चिंताग्रस्त झालाय

“देशाचा शेतकरी हा या देशाचा अन्नदाता आहे, अनेक गोष्टींनी तो अडचणीत आहे. अवकाळी पाऊस, कमी पाऊस या सगळ्यांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये एकूण जी लोकसंख्या होती ती 35 कोटी इतकी होती आणि त्या 35 कोटींच्या 70 ते 80 टक्के लोक हे शेतीवर अवलंबून होते. आज आपण 114 कोटींच्या पुढे गेलेलो आहोत, पण यापैकी 56 लोक हे शेतीवर आहेत याचा अर्थ शेतीवर अडीच ते 3 लोक आहेत, परंतु 300 लोकसंख्या वाढली पण, जमिनीचे क्षेत्र वाढलेले नाही ते दिवसेंदिवस कमी होत चाललेले आहे. त्याचा परिणाम हा आहे की, एका बाजूने लोकसंख्येचा दबाव आणि दुसऱ्या बाजूने विकासासाठी जमीन काढून घेणे. धरण बांधल्यामुळे शेतीची जमीन गेली, एमआयडीसी काढल्यामुळे शेतीची जमीन गेली शहर वाढलीत त्यामुळे शेतीची जमीन गेली, विकासाचे जे काही कार्यक्रम असतील त्यासाठी जमीन ही द्यावी लागते आणि त्यामुळे आज जमिनीचे प्रमाण हे कमी झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ही सहाजिकच चिंताग्रस्त झालेली आहे,” असे शरद पवार यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांना फायदेशीर असे धोरण आखा

“संसदेत आम्ही सातत्याने सांगतो आहोत की, शेती विषयक फायदेशीर धोरणे आखा, त्यासाठी काही न्याय घ्या, अन्य पर्याय शोधा शेतीवरचे लोकसंख्येचे ओझे आपण कमी करूया जोपर्यंत ते कमी होणार नाही तोपर्यंत या देशाची गरीबी ही आपण कमी करू शकत नाही आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारचे धोरण हे केंद्र सरकारकडून आखले जात नाही. याउलट जो पिकवत आहे त्याची किंमत कमी करण्याची जबाबदारी हे सरकार करत आहे. महाराष्ट्र हे साखर निर्मितीसाठी दोन नंबरचे देशातले राज्य आहे. साखरेची किंमत कमी झाली, कापसाची किंमत कमी झाली, सोयाबीनची किंमत खाली आली; कांदा, कापूस, सोयाबीन, साखर या सर्वांवर एक प्रकारचे बंधन आणण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. एका बाजूने किमती घसरल्यात आणि दुसऱ्या बाजूने अशी बंधने टाकायची की, कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावणे याचा अर्थ एका बाजूने किंमत द्यायची नाही आणि कुठून किंमत मिळत असेल, तर त्या ठिकाणी निर्यात करायला वेगवेगळ्या प्रकारची बंधने आणायची या प्रकारची नीती आहे आणि त्याचा परिणाम शेतकरी हा दिवसेंदिवस अडचणीत झालेला आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले

शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सर्व कारणांमुळे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत ही देशासाठी लांच्छनास्पद गोष्ट आहे. परवा मी अचलपूरला होतो तेव्हा काही लोकांनी मला सांगितलं की, “कापसाचे पीक हे शेतकऱ्यांच्या घरात पडलेले आहे बाजारपेठात योग्य भाव नसल्यामुळे 6 महिने ते वर्षभर शेतकऱ्यांना थांबावे लागत आहे. पीक तयार करण्यासाठी बँकेचे कर्ज काढलेले आहे ते कर्ज आता वेळेवर परत करू शकत नाही आणि त्याचा परिणाम व्याजाचा बोजा हा दिवसेंदिवस वाढतोय” या प्रकारची तक्रार त्यादिवशी मी ऐकली, असे शरद पवारांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *