मुंबई, 19 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार हे 1988-91 या काळात राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी शरद पवारांनी लंडनचा दौरा केला होता. यादरम्यान शरद पवार यांनी दुबईमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची भेट घेतली होती. तेंव्हा शरद पवारांना सोन्याचा माळ घालण्यात आली होती, असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यावेळी केंद्र सरकारने शरद पवारांना दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी दिली होती का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
https://x.com/ANI/status/1847237517139165445?t=Qmo3E-NA-DlYUm6bdbwcAQ&s=19
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
1988-91 या काळात शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. यादरम्यान शरद पवार यांनी लंडन दौरा केला. यावेळी ते कॅलिफोर्नियाला तिथे त्यांची एक बैठक झाली. त्यानंतर शरद पवार लंडनमध्ये आले. तेथे ते दोन दिवस राहिले. नंतर शरद पवारांनी दुबई विमानतळावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार पुन्हा लंडनला गेले आणि तेथून ते भारतात परतले, असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
https://x.com/VBAforIndia/status/1847252366199865702?t=ho_gkzKytgqmi9DHE2Cy3w&s=19
प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
1988-91 या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांना केंद्र सरकारची परवानगी असल्याशिवाय दौऱ्यावर जाता येत नाही. तेव्हा केंद्र सरकारने त्यांना कॅलिफोर्नियाच्या बैठकीत उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती का? आणि जर शरद पवार यांना केंद्र सरकारने त्यावेळी परवानगी दिली असेल, तर मग दुबईत जाऊन दाऊद इब्राहिमला भेटण्याची परवानगी पण दिली होती का? आणि त्या बैठकांचा अहवाल केंद्र सरकारला दिला होता का? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला केला आहे. तसेच शरद पवार यांच्या या दौऱ्याची माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.