ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती

नवी दिल्ली, 08 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. त्यामुळे सुधा मूर्ती या आता राज्यसभा खासदार झाल्या आहेत. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. सुधा मूर्ती यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपण सध्या भारतात नसून महिला दिनानिमित्त ही त्यांच्यासाठी मोठी भेट असल्याचे त्याने म्हटले आहे. देशासाठी काम करणे ही नवी जबाबदारी आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

पंतप्रधान मोदींचे ट्विट

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून म्हटले की, “भारताच्या राष्ट्रपतींनी सुधा मूर्ती यांची राज्यसभेवर नियुक्ती केल्याचा मला आनंद आहे. सामाजिक कार्य, परोपकार आणि शिक्षण यासह विविध क्षेत्रात सुधा जी यांचे योगदान अतुलनीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांची राज्यसभेतील उपस्थिती हा आपल्या नारी शक्तीचा एक शक्तिशाली पुरावा आहे. जी आपल्या देशाचे नशीब घडवण्यात महिलांची ताकद आणि क्षमता दर्शवते. मी त्यांना यशस्वी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.”

सुधा मूर्ती यांची ओळख!

दरम्यान, सुधा मूर्ती या इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आणि मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्षा आहेत. तसेच त्या लेखिका, समाजसेविका आहेत. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 73 वर्षीय सुधा मूर्ती यांची आता राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. याच्या आधी भारत सरकारने सुधा मूर्ती यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि 2023 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले आहे. यासोबतच सुधा मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती ही ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *