नाशिक, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचड यांचे शुक्रवारी (दि.06) निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मधुकर पिचड यांचे अल्पशा आजाराने नाशिक येथील रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांना महिनाभरापूर्वी ब्रेन स्ट्रोकमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. दरम्यान, मधुकर पिचड यांच्या निधनामुळे सध्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1865034474200928299?t=vKLbGQ9RVOLA4jYgb4QwBg&s=19
मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून श्रद्धांजली
मधुकर पिचड यांच्या निधनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले. पंचायत समिती, जिल्हा परिषदेपासून सुरूवात करत प्रदीर्घ काळ त्यांनी राज्य विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. विरोधी पक्षनेते, मंत्री अशा विविध जबाबदार्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या. समाजात वावरत असताना अगणित लोकांचे आयुष्य त्यांच्यामुळे उजळले. जीव ओतून काम करताना त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे उभे केले होते. आदिवासींच्या प्रश्नांसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. आर्थिक मागासांसाठी त्यांनी शिक्षणाच्या मोठ्या सुविधा उभारल्या. आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची पायाभरणी त्यांनी केली. अकोले तालुक्यात जलसिंचनासाठी त्यांनी केलेले काम मोठे होते. सहकाराच्या क्षेत्रातही त्यांनी छाप उमटवली. त्यांच्या निधनाने कर्मसिद्धांताचा उपासक आपण गमावला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तस्वकियांच्या दु:खात मी सहभागी आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://x.com/PawarSpeaks/status/1865033928739880977?t=dKdtafazWKtVNWxLB-eagw&s=19
शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मधुकर पिचड यांना श्रद्धांजली वाहिली. माझे जुने सहकारी मधुकरराव पिचड यांची दीर्घ आजाराने प्राणज्योत मालवली. आपल्या राजकीय कारकीर्दीत आदिवासी समाजाचे स्थान आणि आवाज बळकट करण्यात त्यांची मोलाची साथ लाभली. त्यांची ही कारकीर्द नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त करुन मधुकर पिचड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. असे ट्विट शरद पवार यांनी केले आहे.
मधुकर पिचड यांची राजकीय कारकीर्द
मधुकर पिचड यांनी 1972 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येऊन त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. तसेच त्यांनी 1972 मध्ये अकोले तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती म्हणून 1980 पर्यंत काम केले. त्यानंतर मधुकर पिचड यांनी 1980 मध्ये अकोले विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक जिंकली. मधुकरराव पिचड हे 1980 ते 2004 या काळात अकोले विधानसभा मतदारसंघात आमदार राहिले आहेत. त्यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली होती. तसेच मधुकर पिचड यांनी राज्याच्या आदिवासी विकास, वन आणि पर्यावरण विभागाचे मंत्रिपद देखील भूषवले होते. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष देखील झाले होते. दरम्यान, 2019 मध्ये मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला होता.