दिल्ली, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेतील शेवटचा कसोटी सामना 7 मार्चपासून धर्मशाला येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेत भारतीय संघ 3-1 ने आघाडीवर आहे. त्यामुळे भारतीय संघाची नजर पाचवा कसोटी सामना जिंकण्यावर असणार आहे. या पार्श्वभूमीवर, पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या कसोटी सामन्यातून फलंदाज केएल राहुल बाहेर पडला आहे. दुखापतीतून अद्याप बरा झाला नसल्यामुळे त्याची पाचव्या कसोटीत निवड झालेली नाही. तर चौथ्या कसोटी सामन्यात न खेळलेला जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात परतला आहे. यासंदर्भात बीसीसीआयने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1763125455375466681?s=19
दुखापतीमुळे राहुल कसोटीतून बाहेर
निवड समितीने वॉशिंग्टन सुंदरला रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी भारतीय संघातून मुक्त केले आहे. त्यामुळे त्याची पाचव्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. यासोबतच केएल राहुल धर्मशाला येथील पाचव्या आणि अंतिम कसोटीतून बाहेर पडला आहे. बीसीसीआयचे वैद्यकीय पथक त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि त्याच्या समस्येच्या पुढील व्यवस्थापनासाठी लंडनमधील तज्ञांशी चर्चा करत असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.
मोहम्मद शमीच्या तब्येतीविषयी अपडेट
याशिवाय, बीसीसीआयने यावेळी भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्या तब्येतीविषयी अपडेट दिली आहे. मोहम्मद शमीच्या उजव्या टाचांच्या समस्येवर 26 फेब्रुवारी 2024 रोजी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तो बरा होत आहे आणि लवकरच त्याच्या पुनर्वसन प्रक्रियेला सुरूवात करण्यासाठी बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये जाणार आहे. असे बीसीसीआयने म्हटले आहे.
भारतीय संघ:-
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), केएस भरत (विकेटकिपर), देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.