अहमदाबाद, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला हरवून सहाव्यांदा विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडियाला विश्वचषक जिंकता आला नसला तरी आपल्या खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट होती. या सामन्यानंतर विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या निमित्ताने जाणून घेऊया, या विश्वचषकातील विजेत्या आणि उपविजेत्याला संघाला किती कोटी रुपये मिळाले? तसेच कोणत्या खेळाडूंना कोणते पुरस्कार मिळाले आहेत?
टीम इंडियाच्या सदैव पाठीशी – पंतप्रधान मोदी
अंतिम सामना जिंकल्यानंतर विजेत्या संघ ऑस्ट्रेलिया संघाला विश्वचषकाच्या ट्रॉफी सोबत 33 कोटी 17 लाख 62 हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. तर उपविजेत्या भारतीय संघाला देखील बक्षीस म्हणून चांगली रक्कम मिळाली आहे. अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर भारताला 16 कोटी आणि 59 लाख रुपये इतके बक्षीस बक्षीस मिळाले आहे. तर उपांत्य फेरीत पराभव झालेल्या न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांना प्रत्येकी 6 कोटी 63 लाख रुपये इतके बक्षीस मिळाले आहे. याशिवाय, साखळी फेरीत बाद झालेल्या संघांना देखील यावेळी बक्षीसाची रक्कम देण्यात आली. इंग्लंड, पाकिस्तान, श्रीलंका, नेदरलँड्स, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांना बक्षीस म्हणून प्रत्येकी 82.94 लाख रुपये दिले गेले आहेत.
यासोबतच भारताच्या विराट कोहलीने आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या 2023 स्पर्धेचा ‘प्लेअर ऑफ द टूर्नामेंट’ हा पुरस्कार पटकावला आहे. विराटने या स्पर्धेत 11 सामन्यांत सर्वाधिक 765 धावा केल्या. यामध्ये त्याने 3 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली आहेत. तसेच त्याने 1 विकेट आणि 5 झेल घेण्याची कामगिरी केली. याशिवाय विराट कोहलीला विश्वचकात सर्वाधिक धावा केल्यामुळे गोल्डन बॅटचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर भारताच्या मोहम्मद शमीने या विश्वचषकात 7 सामन्यांत 10.71 च्या सरासरीने सर्वाधिक 24 विकेट घेतल्या आहेत. या कामगिरीबद्दल मोहम्मद शमीला सर्वोत्कृष्ट गोलंदाजी फिगर्स पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
भारताला हरवून ऑस्ट्रेलिया बनला सहाव्यांदा विश्वविजेता!
या स्पर्धेत आणखी एका भारतीय खेळाडूला पुरस्कार मिळाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माला सर्वाधिक षटकारांचा पुरस्कार मिळाला आहे. रोहितने या स्पर्धेत एकूण 31 षटकार लगावले. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने 594 धावा केल्या. यामध्ये त्याने सर्वाधिक 4 शतके झळकावली. या कामगिरीमुळे त्याला सर्वाधिक शतकांचा पुरस्कार देण्यात आला. तसेच क्विंटन डी कॉकने यष्टिमागे सर्वाधिक 20 गडी बाद केले. त्यामुळे त्याला यष्टिमागे सर्वाधिक विकेट घेण्याचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात 150.37 च्या स्ट्राइक रेटने नाबाद 201 धावा केल्या होत्या. त्याबद्दल मॅक्सवेलला हायेस्ट स्कोअर आणि हायेस्ट स्ट्रायकर रेट हे पुरस्कार देण्यात आले. तर न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलने या स्पर्धेत सर्वाधिक 11 झेल पकडले होते. या कामगिरीबद्दल डॅरिल मिशेल याला देखील पुरस्कार देण्यात आला आहे. तसेच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने 137 धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे त्याला अंतिम सामन्यातील सामनावीराचा पुरस्कार मिळाला आहे.
One Comment on “पाहा विश्वचषकातील बक्षिसांची संपूर्ण यादी”