मुंबई, 13 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा काल (दि.12) रात्री गोळीबाराच्या घटनेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना रात्रीच अटक केली. तर या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार झाला आहे. दरम्यान, या गोळीबार प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स गँगचा सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूड अभिनेता सलमानच्या मुंबईतील घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
https://x.com/ANI/status/1845328222025654648?t=WnsQMV04NUbqltIWWlw6fg&s=19
https://x.com/ANI/status/1845215085918290010?t=vyAyeEwRyy8JgD6RyhUslQ&s=19
सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत वाढ
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर यापूर्वी सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आलेल्या आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर, सलमान खानच्या घराबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेर लोकांना उभे राहण्यास बंदी घातली आहे. तत्पूर्वी, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. बाबा सिद्दीकी हत्येनंतर सलमान खानने काल रात्री लीलावती रुग्णालयात जाऊन सिद्दीकी कुटुंबीयांची भेट घेतली होती.
फरार आरोपीची ओळख पटली
राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी शनिवारी रात्री वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड गोळीबार केला होता. यातील तीन गोळ्या बाबा सिद्दीकी यांना लागल्या होत्या. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना तात्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कर्नैल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. तर या घटनेतील तिसरा आरोपी सध्या फरार झाला आहे. त्याची ओळख पटली असून, त्याला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, रविवारी (दि.13) सकाळी मुंबईच्या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन याप्रकरणाचा तपास केला. त्यामुळे या प्रकरणात कोणती नवी माहिती मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.