ॲडलेड, 06 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेड येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियन संघाच्या नावावर झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा पहिला डाव 180 धावांत गुंडाळला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 बाद 86 धावा केल्या आहेत. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या नॅथन मॅकस्विनी आणि मार्नस लॅबुशेन यांच्या भक्कम भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियन संघ या कसोटी सामन्यात मजबूत अवस्थेत आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा नॅथन मॅकस्विनी (38) आणि मार्नस लॅबुशेन (20) हे सध्या क्रीजवर नाबाद आहेत.
https://x.com/BCCI/status/1865003217639072098?t=5IpPQE36JObFcLnrL4q-Jg&s=19
गिल आणि राहुल यांची भागीदारी
तत्पूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र यावेळी भारताच्या डावाची सुरूवात खराब झाली कारण सलामीवीर यशस्वी जैस्वाल डावाच्या पहिल्या चेंडूवर खाते न उघडता बाद झाला. त्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी 69 धावांची भागीदारी करून भारताचा डाव सावरला. परंतू, मात्र केएल राहुल 64 चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने 37 धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहली 7 धावांवर बाद झाला. तसेच लगेचच चांगली फलंदाजी करीत असलेला शुभमन गिल देखील बाद झाला. त्याने 51 चेंडूत पाच चौकारांच्या मदतीने 31 धावा केल्या.
मिशेल स्टार्कच्या 6 विकेट
त्यानंतर रिषभ पंत (21) आणि कर्णधार रोहित शर्मा (3) हे झटपट बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ अडचणीत आला होता. त्यावेळी नितीश रेड्डीने शानदार फलंदाजी करीत 54 चेंडूत 42 धावा केल्या. त्याला रविचंद्रन अश्विनने चांगली साथ दिली. अश्विनने यावेळी 22 चेंडूत 22 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्या डावात 180 धावा करता आल्या. दरम्यान, या कसोटीच्या पहिल्या डावात मिशेल स्टार्कने भेदक गोलंदाजी करीत भारताच्या 6 फलंदाजांना बाद केले. तर पॅट कमिन्स आणि बोलंड यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
ऑस्ट्रेलिया अद्याप 94 धावांनी पिछाडीवर
त्यानंतर उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांनी ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरूवात केली. परंतु, 24 धावांवर ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. त्यावेळी जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला स्लिपमध्ये झेलबाद केले. तो 13 धावा करून बाद झाला. त्यानंतर मार्नस लॅबुशेन आणि नॅथन मॅकस्विनी यांनी 62 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. तर मार्नस लॅबुशेन 20 आणि नॅथन मॅकस्विनी 38 धावांवर खेळत आहेत. ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात 1 बाद 86 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघ अजूनही 94 धावांनी भारताच्या मागे आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी भारतीय संघ पुनरागमन करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.