विशाखापट्टणम, 03 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाची दुसऱ्या डावातील धावसंख्या बिनबाद 28 इतकी झाली आहे. तर सध्या कर्णधार रोहित शर्मा 13 आणि यशस्वी जैस्वाल 15 धावांवर खेळत आहेत. भारताकडे आता 171 धावांची आघाडी झाली आहे. तत्पूर्वी, आजच्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव 253 धावांत संपुष्टात आला. यावेळी भारताच्या जसप्रीत बुमराहने इंग्लंडचे 6 गडी बाद केले.
https://twitter.com/BCCI/status/1753744225706111000?s=19
इंग्लंडच्या पहिल्या डावात 253 धावा
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंड संघाचा पहिला डाव 253 धावांत गुंडाळला. यामध्ये इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने 78 चेंडूत सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. त्याने या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार लगावले. त्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने 47 धावा केल्या. यासोबतच बेअरस्टो 25 आणि टॉम हार्टली याने 21 धावा केल्या. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. यासोबतच कुलदीप यादव 3 आणि अक्षर पटेल याने 1 विकेट घेतली.
जैस्वालच्या दिशतकाच्या जोरावर भारताची पहिल्या डावातील धावसंख्या 396
तत्पूर्वी, भारतीय संघाचा पहिला डाव 396 धावांत संपुष्टात आला. त्यावेळी आजच्या दिवशी सुरूवातीला भारताचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने शानदार द्विशतक झळकावले. त्याने 19 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 209 धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतक देखील करता आले नाही. पहिल्या डावात भारताकडून शुभमन गिलने 34 धावांचे योगदान दिले. यासोबत रजत पाटीदार 32, श्रेयस अय्यर 27, अक्षर पटेल 27, केएस भरत 17, रविचंद्रन अश्विन 20 आणि कर्णधार रोहित शर्मा 14 धावा करून बाद झाले. पहिल्या डावात इंग्लंडतर्फे जेम्स अँडरसन, शोएब बशीर, रेहान अहमद यांनी प्रत्येकी 3 आणि टॉम हार्टले याने 1 विकेट घेतली.