मुंबई, 09 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे. तसेच या संदर्भातील राजकीय नेते आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेत असल्याचे दिसत आहे. अशातच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या 10 उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (दि.09) प्रसिद्ध केली आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1843917478784839740?t=20NhDJo7kupd1Uq0yhsTNw&s=19
पहा कोणाला मिळाली संधी?
यामध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघात शहजाद खान सलीम खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच बाळापूर येथे खातीब सयद नातीक्वाद्दीन, परभणी येथे सयद सामी सय साहेबजान, औरंगाबाद मध्य येथे मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक, गंगापूर येथे सय्यद गुलाम नबी सय्यद, कल्याण पश्चिम मतदारसंघांत अयाज गुलजार मोलवी, हडपसर येथे मोहम्मद अफरोज मुल्ला, मान येथे इम्तियाज जफर नदाफ, शिरोळ मध्ये आरिफ मोहम्मदाली पटेल आणि सांगली विधानसभा मतदारसंघात अल्लाउद्दीन हयातचंद काझी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
यापूर्वी पहिली यादी प्रसिद्ध
तत्पूर्वी, वंचित बहुजन आघाडी पक्षाने 21 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये त्यांनी 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. या यादीत रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली, नांदेड दक्षिण, लोहा, छत्रपती संभाजीनगर पूर्व, शेवगाव आणि खानापूर या मतदारसंघांचा समावेश आहे.