दिल्ली, 20 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या डीपफेक व्हिडिओ प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 4 संशयितांचा शोध घेतला आहे. या चौघांची सध्या पोलीस चौकशी करीत आहेत. दरम्यान, हे चौघेजण व्हिडीओ तयार करणारे नाहीत. तर या चौघांनी रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दिल्ली पोलीस आता या प्रकरणातील मुख्य आरोपीचा शोध घेत आहेत.
https://twitter.com/ANI/status/1737309214182392060?s=19
META कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या संशयितांचा शोध घेतला. दरम्यान, या चौघांनी या वर्षी नोव्हेंबर महिन्यात रश्मिकाचा डीपफेक (बनावट) व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. त्यानंतर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विट करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही डीपफेक प्रकरणावर भाष्य करत ही घटना अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, दिल्ली पोलिसांनी आयपीसी, 1860 च्या 465 आणि 469 आणि आयटी कायदा, 2000 च्या कलम 66C आणि 66E अंतर्गत एफआयआर नोंदवला होता.
https://twitter.com/ANI/status/1723029680356262179?s=19
हे प्रकरण तापल्याचे लक्षात येताच या आरोपींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरील रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ डिलीट केला होता. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण झाले होते. मात्र, आज अखेर पोलिसांनी या प्रकरणातील 4 संशयितांचा शोध घेतला आहे. सध्या त्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. तर या प्रकरणातील मुख्य सूत्रधारचा पोलीस शोध घेत आहेत.
https://twitter.com/iamRashmika/status/1721555684922364130?s=19
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रश्मिका मंदानाचा एक डीपफेक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रश्मिका सारखी दिसणारी एक महिला लिफ्टमधून येताना दिसत आहे. तर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारी महिला रश्मिका नसून ती परदेशात राहणारी सोशल मीडिया ब्लॉगर झारा पटेल आहे. या व्हिडिओत AI तंत्रज्ञानाच्या साहाय्याने झारा पटेलच्या चेहऱ्याच्या जागी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा चेहरा लावण्यात आला होता. दरम्यान, डीपफेक हे एक असे डिजिटल तंत्रज्ञान आहे की, ज्यामध्ये, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीच्या फोटो किंवा व्हिडीओला सहजपणे दुसऱ्याचा चेहरा लावता येऊ शकतो. त्यामुळे सध्या गैरप्रकार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.