समुद्रात सागरी बोटीला आग, 18 जण सुखरूप बचावले

अलिबाग समुद्रात जळणारी बोट

अलिबाग, 28 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील अक्षी किनाऱ्यापासून सुमारे सहा ते सात सागरी मैल अंतरावर असलेल्या एका मासेमारी करणाऱ्या बोटीला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही बोट राकेश गण यांच्या मालकीची असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दल आणि नौदलाने तातडीने मदत कार्य हाती घेतले. या जलद बचाव मोहिमेमुळे बोटीवरील सर्व 18 मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

https://x.com/ANI/status/1895372340479058129?t=n_81bcFpFlO1xPAM3o854g&s=19

18 जणांचे प्राण वाचवले

ही घटना शुक्रवारी (दि.28) पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास घडली. त्यावेळी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या बोटीला अचानकपणे आग लागली. त्यावेळी मासेमारी करणाऱ्या बोटीत एकूण 18 जण होते. त्या आगीमुळे या लोकांमध्ये घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच, तटरक्षक दलाचे पथक आणि नौदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू करून सर्व मच्छीमारांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यासंदर्भातील माहिती रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.

आग विझविण्यात यश

दरम्यान, सध्या बोटीला लागलेली ही आग विझविण्यात आली आहे. या आगीमुळे या बोटीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून यासंबंधी चौकशी सुरू आहे. तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासा देणारी बाब असली तरी अशा दुर्घटना भविष्यात टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना अधिक बळकट करण्याची गरज आहे. तसेच या घटनेचा पुढील तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *