पुणे, 30 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात करण्याचा महत्त्वाचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी आणि शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. या निर्णयानुसार प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11.15 वाजेपर्यंत तर माध्यमिक शाळांसाठी 7 ते 11.45 वाजेपर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व शाळांनी या वेळापत्रकाचे पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
https://x.com/airnews_mumbai/status/1906000959375131109?t=nhbXfNy9-TflY6Ldg-_-IA&s=19
महत्वपूर्ण निर्णय
सध्या राज्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. तसेच उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन शाळेची वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे लहान मुलांमध्ये उष्माघात, डिहायड्रेशन आणि अशक्तपणा यांसारख्या त्रासांची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळा बसू नयेत म्हणून सकाळच्या सत्रातच शाळा घेण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
सरकारने घेतली दखल
दरम्यान, राज्यातील वाढत्या तापमानामुळे विविध संघटनांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याची मागणी सरकारकडे केली होती. उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने सकाळच्या सत्रातच शाळा घेण्याची विनंती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेत हा आदेश जारी केला आहे.
निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना
शाळांनी या बदललेल्या वेळेची अंमलबजावणी तातडीने करावी. तसेच विद्यार्थ्यांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे आवाहनही शिक्षण विभागाने केले आहे. तसेच, पालकांनीही मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे आणि त्यांना पुरेसे पाणी व आवश्यक तो आहार देण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.