छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केकेत जळगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 257 विद्यार्थ्यांना बिस्कीट खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी 153 विद्यार्थ्यांवर उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. 7 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती शंभाजीनगर सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शनिवारी (दि.18) सकाळी या शाळेत पोषण आहार वाटप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले होते. त्यानंतर ही घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
https://x.com/supriya_sule/status/1825150677863006486?s=19
https://x.com/SandipanBhumare/status/1825101337358442766?s=19
विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू
तत्पूर्वी, विद्यार्थ्यांनी ही बिस्किटे खाल्ल्यानंतर काही क्षणांतच विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थ आणि इतर अधिकाऱ्यांनी तातडीने शाळेत पोहोचून या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी 7 विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. ही बिस्किटे खाल्ल्यामुळे विद्यार्थ्यांना हा त्रास झाला असल्याचे म्हटले जात आहे. परंतु, यासंदर्भात प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. सध्या या प्रकरणाचा तपास प्रशासनाकडून केला जात आहे. दरम्यान, खासदार संदीपान भुमरे यांनी आज छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली. केकत जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी संदीपान भुमरे यांनी उपस्थित डॉक्टरांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे विद्यार्थ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच यावेळी त्यांनी या विद्यार्थ्यांवर योग्य उपचार करण्यासंदर्भात वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील केकत जळगाव येथील शालेय पूरक आहारात दिलेली बिस्किटे खाल्ल्याने काही मुलांना विषबाधा झाली आहे. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील काही मुलांची तब्येत गंभीर असल्याचे समजते. ही अतिशय गंभीर बाब आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. ही सर्व मुले लवकर बरी व्हावी आणि सुखरूप घरी परतावी ही ईश्वरचरणी प्रार्थना, असे सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.