ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक

पुणे, 05 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ड्रग्स तस्कर ललित पाटील प्रकरणी येरवडा कारागृहातील डॉ. संजय मरसाळे यांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणात आता पुण्याच्या ससून रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर देवकाते यांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे एकच खळबळ उडाली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ललित पाटीलला डॉक्टर समीर देवकाते यांनी मदत केल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे.

तर येरवडा कारागृहातील डॉक्टर संजय मरसाळे यांनी ललित पाटील हा आजारी असल्याचे खोटे सांगून, त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी शिफारस केली होती, हे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या कामासाठी त्यांनी ललित पाटीलकडून पैसे घेतले होते, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच संजय मरसाळे यांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि त्याचा सहकारी अभिषेक बलकवडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला असल्याचे ही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. तर याप्रकरणाचा तपास सध्या गुन्हे शाखेकडून केला जात आहे.

तत्पूर्वी ललित पाटील याला ऑक्टोंबर 2020 मध्ये चाकण येथून 20 कोटी रुपये किमतीचे मेफेड्रोन ड्रग्स बाळगल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्यानंतर येरवडा कारागृहातील डॉक्टर संजय मरसाळे यांच्या शिफारशीवरून ललित पाटील हा खोट्या आजाराचा बहाणा करून पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारासाठी सातत्याने दाखल होत होता. याप्रकरणी डॉक्टर संजय मरसाळे यांना सोमवारी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

तर ससून रुग्णालयात ललित पाटील याच्यावर डॉक्टर समीर देवकाते हे उपचार करीत होते. यावेळी समीर देवकाते यांनी ललित पाटील याला उपचारांची अजून गरज असल्याचे सांगत, त्यांनी ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढवला होता, हे देखील पोलीस तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी डॉक्टर समीर देवकाते यांना आज कोर्टात हजर केले जाण्याची शक्यता आहे.

केंद्राने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

दरम्यान ललित पाटील हा ससून रुग्णालयात उपचार घेत असताना, ललित दोन आयफोनच्या मदतीने ड्रग रॅकेट चालवत असल्याचे पोलिसांना आढळले होते. तर याप्रकरणाचा तपास सुरू असताना ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळून गेला होता. पळून गेल्यानंतर ललित पाटील याला 17 ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांनी पुन्हा अटक केली होती. सध्या त्याची पळून गेल्याप्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे.

One Comment on “ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरला अटक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *