मुंबई, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज (दि.06) राज्याच्या राज्यपाल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी या सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. या शिष्टमंडळात संभाजीराजे छत्रपती, भाजप आमदार सुरेश धस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे, जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, ज्योती मेटे यांचा समावेश होता.
https://x.com/iambadasdanve/status/1876166669921575367?t=6JQVteCQnw3z1CBaLkqodA&s=19
https://x.com/VijayWadettiwar/status/1876185652686946400?t=pQMvcbjGBQP7oeLxtuvv-A&s=19
राज्यपालांना निवेदन
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुष छळ करून निर्घृण हत्या करण्यात आली. त्यावरून बीडमधील कायदा व सुव्यवस्था सध्या ढासळत चालली असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात राज्यपालांनी लक्ष घालावे आणि त्यांनी यामध्ये तातडीने हस्तक्षेप करावा. तसेच या प्रकरणातील तपासात हस्तक्षेप होण्याची शक्यता लक्षात घेऊन मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, अशी मागणी या सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदनातून राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे राज्यपाल यासंदर्भात कोणती भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आतापर्यंत सात जणांना अटक
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पवनचक्की प्रकल्पात खंडणी मागणाऱ्या गटाला रोखल्यामुळे ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तसेच वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे धनंजय मुंडे यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी, अशी मागणी सध्या केली जात आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी सध्या फरार आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी समितीची स्थापना केली आहे. तर या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याची परिस्थिती निर्माण झाली असून, जनतेत प्रचंड असंतोष पसरला आहे.