संतोष देशमुख हत्या प्रकरण; वाल्मिक कराड पोलिसांना शरण

पुणे, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने आज (दि.31) पुण्यातील सीआयडी मुख्यालयात जाऊन शरणागती पत्करली आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर तो फरार झाला होता. तेंव्हापासून त्याच्या अटकेची मागणी केली जात होती. त्यानंतर अखेर आज वाल्मिक कराड पोलिसांना शरण आला आहे. त्यामुळे त्याच्याकडून पोलिसांना कोणती नवी माहिती मिळते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

https://x.com/ANI/status/1873984445155598634?t=_ibxF7IQRjDh99SotcK0wA&s=19

तीन आरोपी अद्याप फरार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हे हत्या प्रकरण पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित आहे. संतोष देशमुख यांनी त्या खंडणी प्रकरणात प्रकरणात हस्तक्षेप केला होता. याच रागातून आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केली असल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

तत्पूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सीआयडीला महत्वाचे निर्देश दिले होते. या प्रकरणातील फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले होते. तसेच शस्त्रांसोबत असलेल्या लोकांचे व्हायरल होत असलेले फोटो खरे असल्यास त्यांचे शस्त्र परवाने रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार सीआयडीने फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर वाल्मिक कराड लवकरच पोलिसांना शरण जाणार असल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या होत्या. अशा परिस्थितीत वाल्मिक कराड आज सीआयडी समोर शरण आला आहे. दरम्यान, वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय मानला जातो. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण तापले होते. त्यावरून अनेक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर आता सीआयडी वाल्मिक कराडची चौकशी करीत आहे. या चौकशीत कोणती माहिती पुढे येते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *