संतोष देशमुख हत्या प्रकरण; बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली, फडणवीसांची माहिती

नागपूर, 20 डिसेंबर (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. तर या प्रकरणात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या हत्या प्रकरणाचा तत्काळ सखोल तपास करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच यासंदर्भात विरोधी पक्षांतील नेते देखील आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.20) संतोष देशमुख हत्या प्रकरणी विधानसभेत निवेदन सादर करून त्या संदर्भातील माहिती दिली आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1870013151409832335?t=oYB8RvbFA0iz9438Uc1drg&s=19

https://x.com/ANI/status/1870003148041138485?t=wfT1ieRqTOOTgTdUabWlKA&s=19

संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास राज्य सरकार आयजी स्तरावरील अधिकाऱ्यांकडून एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल आणि ही चौकशी तीन ते सहा महिन्यांत पूर्ण केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. या हत्या प्रकरणाचा जो कोणीही मास्टरमाईंड असेल, त्यावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. असे ही त्यांनी यावेळी सांगितले. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी मृत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची बदली

तसेच हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर असून यात पोलीस प्रशासनाने कामात कुचराई केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षक यांची बदली करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून सरकार याबाबत कारवाई करेल. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठेवणे ही सरकारची आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला तत्परतेने कार्यवाही करण्यास सांगितले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

दरम्यान, आवाडा एनर्जी कंपनीने पवनचक्कीमध्ये फार मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे ऑफीस मस्साजोग येथे आहे. या प्रकरणातील आरोपी 6 डिसेंबर रोजी दुपारी आवाडा एनर्जी कंपनीच्या ऑफिसमध्ये खंडणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी या आरोपींनी सर्वप्रथम येथील वॉचमॅम अमरदिप सोनावणे आणि त्यानंतर मॅनेजर शिवाजीराव थोपटे यांना शिवीगाळ आणि मारहाण केली. या घटनेची माहिती मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना समजली. त्यानंतर ते गावातील लोकांना सोबत घेऊन घटनास्थळी आले. यावेळी आरोपी आणि मस्साजोग गावातील ग्रामस्थ यांच्यात मारामारी झाली. त्यानंतर ते सर्व आरोपी पळून गेले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख हे चारचाकी गाडीतून आपल्या गावी परत जात होते. त्यावेळी वाटेत या आरोपींनी त्यांच्या गाडीवर हल्ला करून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केली. यावेळी आरोपींची संतोष देशमुख यांना बराचवेळ मारहाण केली होती. यात त्यांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *