पुणे, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात आज (दि.04) आणखी तीन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तिघांमध्ये सुदर्शन घुले (26), सुधीर सांगळे (23), आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील केज येथील न्यायालयाने या तिघा आरोपींना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
https://x.com/PTI_News/status/1875529215132733892?t=12cJ0LWAghXWy8tpIFsrnQ&s=19
संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय आहे. संतोष देशमुख यांनी या खंडणी प्रकरणात हस्तक्षेप केला होता, ज्यामुळे त्यांची हत्या केली गेली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी काही दिवसांपूर्वी फरार आरोपींच्या मालमत्तेची जप्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, या फरार आरोपींच्या मालमत्तेची जप्ती करण्यात आली. त्यानंतर आता पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात यश येत आहे.
तपासासाठी एसआयटी स्थापन
तत्पूर्वी, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने आयपीएस अधिकारी बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा आणि पुणे सीआयडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या विशेष तपास पथकात पोलीस विभागाने नऊ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले गेले आहेत, याची माहिती राज्य सरकारच्या जीआर मधून देण्यात आली आली आहे.