बीड, 04 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे हादरवून टाकणारे फोटो समोर आल्याने लोकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. या फोटोंमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करताना निर्दयीपणे हसताना दिसत आहेत. हे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी नागरिक आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.
आरोपी कृष्णा आंधळे फरार
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे. वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि जयराम चाटे अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरण
संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण पवनचक्की प्रकल्पातील खंडणी प्रकरण थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे. 9 डिसेंबर रोजी त्यांचे अपहरण करून त्यांच्यावर अमानुष छळ करण्यात आला आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर राज्य सरकारने तातडीने विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. तसेच या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि कोणत्याही आरोपीला मोकळे सोडले जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केलेले आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे राज्यभरात प्रचंड संताप असून, आरोपींना तातडीने शिक्षा व्हावी, अशी मागणी वाढत आहे.