संतोष देशमुख हत्या प्रकरण; शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र

शरद पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र

मुंबई, 06 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील संबंधित आरोपींना त्वरित अटक करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. बीड-परळी भागातील गुंड प्रवृत्तीची पाळेमूळे खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे. त्यामुळे याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी लोकप्रतिनिधींना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी देखील शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

https://x.com/PawarSpeaks/status/1876150339659067873?t=WREslr7tHOILJJlH6m1KEg&s=19

शरद पवारांनी पत्रात काय म्हटले?

मागील महिन्यात बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे काही गुंडानी अपहरण करून निर्घृण हत्या केली. सदर अमानवीय घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उमटले. गुन्ह्यातील फरार आरोपींना आणि त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक करावी म्हणून महाराष्ट्राभरात आंदोलने उभी राहिली आहेत. यासंदर्भात बीड जिल्ह्यात निघालेला पहिला आक्रोश मोर्चा राज्यशासनापर्यंत या घटनेचे गांभीर्य पोहोचवणारा होता. त्यात जात, धर्म आणि पक्ष हे भेद बाजूला सारून क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या घटनेचा निषेध झाला. फरार आरोपींना व त्यामागील सुत्रधारांना तात्काळ अटक होऊन कडक शासन व्हावे अशी एकमुखाने मागणी करण्यात आली, असे शरद पवारांनी या पत्रात म्हटले आहे.



सदर आक्रोश मोर्चाच्या सांगता प्रसंगी आमदार सर्वश्री संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, जितेंद्र आव्हाड, अभिमन्यू पवार आणि सुरेश धस तसेच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. या घटनेत सहभागी असणारे गुड, घटनेचे सुत्रधार व घटनेस जबाबदार असणाऱ्या व्यक्तींचा नामोल्लेख केला. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेला लांछन लावणाऱ्या ह्या घटनेचा तातडीने तपास व्हावा, त्यासाठी प्रसारमाध्यमे देखील महत्त्वाची भुमिका बजावित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न

संतोष देशमुख यांची माणूसकीला काळीमा फासणारी घटना केवळ एकच नसून यापूर्वी हत्या, अपहरण, खंडणी, खोटे गुन्हे दाखल होणे अशा अनेक घटना बीड-परळी भागात घडल्या असल्याने त्या घटनांची पाळेमूळे खणून काढावीत अशी देखील मागणी केली. अनेक घटनांचा परस्परसंबंध असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली. एकूणच अनेक प्रकरणांची मालिका तपासात समोर येण्याची शक्यता असल्याने उपरोल्लेखीत लोकप्रतिनिधी तसेच सदर मंचावरून जनतेला संबोधित करणाऱ्या इतर सन्माननीय व्यक्ती यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. आपणास विनंती की, सदर घटनेविरूद्ध आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधी व इतर नेत्यांच्या जिवितास आणि आरोग्यास कोणताही धोका उत्पन्न होऊ नये म्हणून वेळीच खबरदारी घ्यावी. तसेच त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन योग्य ते पोलिस संरक्षण राज्यशासनामार्फत पुरवण्यात यावे, अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *